लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांत गर्भधारणा झाली नाही, की स्त्रिया अस्वस्थ होतात.
डॉक्टरांच्या क्लिनिकचे उंबरठे झिजवायला लागतात. हे योग्य नाही. पती-पत्नीने निदान
वर्षभर तरी एकत्र राहायला हवं. अर्थात स्त्रीचं वय
पस्तिशीपेक्षा जास्त असेल, तर लवकर सल्ला घ्यायला हरकत नाही. त्यानंतरच डॉक्टरांना भेटायला हवं.
स्थूल स्त्रियांना गर्भधारणा व्हायला त्रास होतो. यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावं.
स्मोकिंग आणि ड्रिंकिंग टाळावं. नव-यानेही या गोष्टी करू नयेत. दारूमुळे शुक्रजंतूंची संख्या
कमी होते. स्त्रियांनी दारू प्यायल्यास तयार झालेल्या गर्भालाही इजा होऊ शकते. पुरुषांनी
फार गरम पाण्याने आंघोळ केल्यास, वारंवार सोना बाथ किंवा गरम पाण्याने टबबाथ घेतल्यास
त्यांचे शुक्रजंतू कमी होतात.
फार चिंता केल्यासही गर्भधारणेची शक्यता कमी होते. ब-याच स्त्रिया गर्भधारणा झाली
नाही, याचीच चिंता करतात. हे टाळायला हवं. मन प्रफुल्लित असेल, तर गर्भधारणा लवकर
होईल. दोन पाळ्यांच्या मधल्या दिवसांमध्ये अंडाशयातून अंडं बाहेर निघतं. या काळात दर
दिवसाआड शरीरसंबंध झाल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. अंड्यांचं आयुष्य ४८ ते ७२ तासांचं
असतं आणि दिवसाआड संबंध झाल्यास शुक्रजंतूंची संख्या ही वाढलेली असते.
अनेकदा प्रश्न याहूनही मूलभूत असतो. जोडप्यांचा शरीरसंबंधही नीट होत नाही. यासाठी
डॉक्टरी सल्ला घेणं फार चांगलं. लैंगिक शिक्षण हाही त्यावरचा उत्तम उपाय ठरेल.