डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल?
हेल्पलाइन आणि अधिक माहितीसाठी
महाऑनलाइनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास support@mahaonline.gov.in या ईमेल आयडीवर किंवा ०२२-६१३१६४०० या क्रमाकांवर संपर्क साधता येणार आहे.
राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते. पूर्वी राज्यातील कोर्टांमध्ये मिळणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात, तर सरकारतर्फे सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. पहिल्या पद्धतीनुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने 'आपले सरकार'च्या महाऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन अर्ज
'आपले सरकार'च्या माध्यमातून सरकारने अनेक प्रमाणपत्रे मिळविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच डोमेसाइल प्रमाणपत्रासाठीही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केला आहे. त्यानुसार या वेबसाइटवर अर्जदारांनी आपला लॉग इन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील शुल्क भरून अर्ज करता येईल.
महासेवा केंद्राद्वारे करावयाचा अर्ज
'आपले सरकार'च्या माध्यमातूनच महाऑनलाइनच्या मदतीने राज्य सरकारने मुंबईभरात अनेक महासेवा केंद्राची उभारणी केली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ५३ महासेवा केंद्र असून, या केंद्राची माहिती महाऑनलाइनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्या केंद्रावर आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने आणि अर्जदारांच्या माहितीने भरलेल्या पूर्ण अर्जाच्या सहाय्याने हे अर्ज करता येणार आहे.
लागणारा कालावधी
साधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदारांना १५ दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. १५ दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्यासंदर्भात त्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सेतू केंद्रावरही संधी
महासेवा केंद्राबरोबर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राच्या मदतीनेही डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकेल. त्यासाठी सेतू केंद्राच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपब्लध असून, हा अर्ज भरून त्या त्या सेतू केंद्रावर हा अर्ज सादर करून डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकतो.
सेतू केंद्रावरील प्रक्रिया
सेतू केंद्रावर उपब्लध करून दिलेला अर्ज भरल्यानंतर. त्यात पाच रुपयांचा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्टॅम्प) अर्जाची छापील प्रत काढून त्यावर विहित जागी चिकटवणे गरजेचे आहे. तर आदिवासी अर्जदाराने (अनुसूचित जमाती - ST) न्यायिक मुद्रांक शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तर जन्म दिनांक व जन्म ठिकाण याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला सबळ पुरावा आवश्यक आहे. जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास महाराष्ट्रात आजपासून मागील सलग १० वर्षे राहात असल्याचा पुरावा स्थलांतरीत व्यक्ती असल्यास अथवा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास, मूळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचा व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडिलांचे/पालकांचे अधिवास प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, 'आरएसबीवाय'कार्ड, वाहनचालक परवाना
पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा
वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला
इतर आवश्यक कागदपत्रे
वीज देयक, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला