Monday, December 28, 2015

खंडित संभोग आणि सुरक्षित काळ

 
 खंडित संभोग आणि सुरक्षित काळात संभोग करणं या दोन्ही गर्भनिरोधक पद्धतींची माहिती द्यावी. या पद्धती कितपत आणि कशा उपयोगी आहेत ते स्पष्ट करावं. 
  खंडित संभोग म्हणजे संभोग करत असताना वीर्यस्खलन होण्याआधी पुरुषाने आपलं शिश्न योनीमार्गातून बाहेर काढून घेणं. हमखास फसणारा, फेल होणारा असा हा प्रकार आहे. कारण स्वत:च्या अंदाजापेक्षा आधी जर वीर्य स्खलित झालं तर गर्भ राहू शकतो. आपलं वीर्य नक्की कधी निघेल याचा नेमका अंदाज करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय वीर्यस्खलनाआधी निघणाऱ्या स्त्रावांमध्ये शुक्रजंतू असू शकतात, त्यामुळे हा प्रकार मुळीच सुरक्षित नाही.

सुरक्षित काळात संभोग करणं हाही असाच जुना गर्भप्रतिबंधक उपाय. स्त्रीबीज निघण्याच्या काळात संभोग टाळणं या तत्त्वावर ही पद्धत अवलंबून आहे. हा सुरक्षित काळ मोजण्याचं केवळ ज्ञान असून पुरेसं नाही. कारण प्रत्येक पाळी ही अपेक्षित दिवशी येईलच याची खात्री बाळगणं अवघड असतं. स्त्रीच्या पुढील येणाऱ्या पाळीच्या संभाव्य प्रथम दिवसामागे जर चौदा दिवस मोजले तर त्या दिवशी तिच्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये नवं स्त्रीबीज निर्माण होतं, म्हणजेच ओव्ह्युलेशन घडून येतं. या दिवसासकट त्याआधीचे चार दिवस आणि नंतरचे चार दिवस असे एकूण नऊ दिवस असुरक्षित मानले जातात. गर्भधारणा यांपैकी कोणत्याही दिवशी हेऊ शकते. या नऊ दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी संभोग केल्यास गर्भधारणा होत नाही असं मानलं जातं. दिवसांच्या मोजमापावरची ही पद्धत जगभरातले डॉक्टर्स आज बेभरवशाची मानतात.